खामगावमध्ये विकास थांबवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना जनता कायमचीच लोळवणार — संजय शिनगारे यांचा जोरदार पलटवार
खामगावमध्ये विकास थांबवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना जनता कायमचीच लोळवणार — संजय शिनगारे यांचा जोरदार पलटवार
खामगाव नगरपरिषद निवडणुकीत वातावरण तापत असतानाच विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांच्या भडीमाराला भाजपच्या वतीने जिल्हा सचिव संजय शिनगारे यांनी धारदार प्रतिउत्तर दिले आहे. “शहराचा चेहरा बदलून टाकणारा विकास डोळ्यांसमोर असताना ‘विकास नाही’ म्हणणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत जनता कायमचीच लोळवणार आहे. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, म्हणून खोटे आरोप आणि अफवांची धुरळेबाजी सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला.
*“ज्यांनी खामगावला खऱ्या शाश्वत विकासापासून वंचित ठेवले त्यांनी आज आम्हाला विकास शिकवणे म्हणजे विनोद!”**
शिनगारे म्हणाले की, विरोधकांचा इतिहासच शहराचे नुकसान करणारा आहे. “त्यांच्या कारकीर्दीत जी कामे झाली नाहीत, ती आम्ही गेल्या दशकात प्रत्यक्ष करून दाखवली. त्यामुळेच त्यांच्या अंगाला विकासाची चर्चा सहन होत नाही. शहर चालवताना काय करायचं आणि कसं करायचं हे ज्यांना कधी कळलंच नाही, ते आज तोंडाला फेस फोडत आरोप करत फिरत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल शिनगारे यांनी केला.
*रस्त्यांवरून टीका करणाऱ्यांनी आधी रस्ते कसे असतात ते तरी पाहावेत**
विरोधकांनी ‘रस्त्यांची कामे निकृष्ट आहेत’, ‘पूर्ण झाली नाहीत’, ‘थांबलेली आहेत’, ‘नागरिक त्रस्त आहेत’ अशी जी बोंबाबोंब केली आहे, त्यावर शिनगारे यांनी सरळसरळ उत्तर दिले:
“खामगावच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी तब्बल २९ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. इतका मोठा प्रकल्प हातात घेतला की काही काळ तांत्रिक अडचणी, जॉईनिंग गॅप्स, धूळ, अडथळे येतातच. त्याला निकृष्ट म्हणणारे म्हणजे तांत्रिक अज्ञान पसरवणारे लोक.”
ते पुढे म्हणाले, “आज १३ रस्ते पूर्णत्वाकडे आले आहेत, आणि उरलेले १६ रस्ते वेगात सुरू होणार आहेत. हे सर्व रस्ते पुढील 20 ते 25 वर्षांच्या दृष्टीने अधिक मजबूत आणि दीर्घकाल टिकतील अश्या पद्धतीने बांधले जात आहेत. नागरिकांना तात्पुरता त्रास नक्की आहे, परंतु हा त्रास दीर्घकालीन सुविधेसाठी आहे. रस्ता बनण्याआधी थोडा धूर, धूळ, खोदकाम अपरिहार्य असतं—हे माहित असूनही त्याच्यावर राजकारण करणारे शहराचे भले कधीच इच्छित नाहीत.”
*निधी गैरवापराचा आरोप म्हणजे विनोद—पारदर्शकतेचे धडे देणाऱ्यांची स्वतःची तिजोरी काळी*
विरोधकांनी केलेल्या “निधीचा गैरवापर झालाय” या आरोपावर शिनगारे अधिक आक्रमक झाले.
“ज्यांच्या कारकीर्दीत निधी फक्त दिखाव्यावर खर्च होत होता , ते आज पारदर्शकतेचे लेक्चर देतात, हेच हास्यास्पद आहे. आमच्या प्रत्येक प्रकल्पाचा अर्थसंकल्प, तांत्रिक मानके, मंजुरी, खर्च—सगळं खुलेपणाने जनतेसमोर आहे. गैरवापराचे आरोप म्हणजे त्यांची स्वतःची काळी छाया आमच्यावर टाकण्याचा प्रयत्न,” असे त्यांनी स्पष्ट केले.
*अफवांमध्ये हवा, कामांमध्ये दम—जनता खरे-खोटे ओळखते*
शिनगारे म्हणाले की, विरोधकांचे आरोप ही त्यांची हतबलता दाखवणारी लक्षणे आहेत. “कामे नाकारून मिळणारा राजकीय फायदा शहरात कुणाला मिळाला नाही आणि मिळणारही नाही. जनता प्रत्यक्ष पाहत आहे की खामगावच विकास मॉडेल कस बदलू लागल आहे. अफवांमध्ये हवा असते, कामांमध्ये दम असतो—जनता हे चांगलं ओळखते.”
*खामगावचे पुढील दशक ठरलेले आहे—आणखी मोठी कामे, अधिक वेगात*
“पुढील काळात पाणीपुरवठ्याची शाश्वत योजना, नवीन ड्रेनेज लाइन, विस्तृत रस्ते-जाळे, हरित उपक्रम, आधुनिक बाजारपेठा, महिला-सुरक्षेची पायाभूत सोय, युवकांसाठी रोजगार उपक्रम आणि डिजिटल प्रशासन—ही सर्व कामे आता सुपर-फास्ट मोडमध्ये जातील,” असे शिनगारे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “विरोधकांचे काम थांबवण्याचे राजकारण आम्हाला माहीत आहे. पण आमचं काम थांबत नाही. खामगावचा विकास हा राजकीय घोषणांचा नव्हे, तर केलेल्या कामांचा पुरावा आहे. आरोप करणारे येतील-जातील; शहराच्या प्रगतीचा प्रवास मात्र थांबणार नाही.”
*विकास कामात काड्या करणे हीच विरोधकांची जनसेवा आहे का ?*
ना. आकाशदादा फुंडकर यांच्या पुढाकारातून खामगाव शहरात गत १० वर्षांत मोठ्या प्रमाणात पायाभूत विकास झाला आहे. येणारी पाच वर्ष ही खामगाव शहराला विकसित शहर म्हणून बदलविण्यासाठीचा रोडमॅप तयार झाला आहे. ही विकास कामे वेगाने पुढे सरकत असताना एक माजी प्रतिनिधी त्यात अडथळे आणण्याचा पाजीपणा करत आहे. नागरी सुविधांसाठी कोणतंही विकास काम सुरु झाले कि काड्या करण्याची त्यांची खोड काही केल्या जात नाही. जनतेने नाकारले, कार्यकर्ते सोडून गेलेलं आणि उरलीसुरली सत्तास्थानं हातातून गेल्याने हतबल झालेले विरोधक मनात येईल ते आरोप करीत आहेत.
या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही हे विरोधकांना आधीच कळून चुकले आहे. त्यामुळे ते आक्राळस्तेपणाने सोशल मीडियावर ए. आय. निर्मित खोटा प्रचार करीत सुटले आहेत. असे ही शिंनगारे यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे
Comments
Post a Comment