हप्त्याच्या बदल्यात ट्रक मोकळे, खामगावात ओव्हरलोडचा खुला खेळ!नियमांना हरताळः ट्रकवाल्यांना हप्त्यांवर मुभा, कायदा कुणाच्या खिशात?खामगाव (दिव्यांग शक्ती)
हप्त्याच्या बदल्यात ट्रक मोकळे, खामगावात ओव्हरलोडचा खुला खेळ!
नियमांना हरताळः ट्रकवाल्यांना हप्त्यांवर मुभा, कायदा कुणाच्या खिशात?
खामगाव (दिव्यांग शक्ती) ः खामगाव येथील स्थानिक रेल्वे मालधक्क्यावरून दर महिन्याला हजारो क्विंटल सिमेंट, धान्य व युरिया खत ट्रकद्वारे बुलढाणा जिल्ह्यात पाठविण्यात येतो. मात्र या वाहतुकीदरम्यान क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेले ट्रक खुलेआम रस्त्यावर धावत आहेत. विशेष म्हणजे, ही ओव्हरलोड वाहतुक आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. 56 आरटीओ कार्यालय खामगावला स्थलांतरित झाल्यानंतर या अनियमितता लक्षणीय वाढ झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीसाठी ट्रक मालकांकडून दर महिन्याला एका ट्रक मागे 2500 रुपये हप्ता वसूल केला जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच एम.एच. 28 करिता 3 हजार रुपये प्रमाणे एजंटद्वारे हप्ता वसूल केल्या जात आहे. हे पैसे थेट आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत ‘एजंट’च्या माध्यमातुन पोहोचवले जात असल्याचा आरोप ट्रक चालक आणि स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे. या प्रकरणात अनेक ट्रक चालकांकडे आवश्यक कागदपत्रे, टॅक्स, फिटनेस सर्टिफिकेट तसेच प्रदूषण प्रमाणपत्रही नाही. काही वाहने तर पूर्णपणे कालबाह्य (एक्सपायर) असूनही रस्त्याावर चालविल्या जात आहेत. या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा हप्ता मिळत असल्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे ट्रक पकडले गेले, तरी एजंटकडून एका फोनवर हप्ता भरलेला असल्याची खात्री दिल्यानंतर ट्रक सोडण्यात येतात. त्यामुळे कायदा, नियम, वाहतुक सुरक्षेचे सर्व नियम निकष धाब्यावर बसवून ओव्हरलोड वाहतुक सुरू आहे.
खामगाव येथील रेल्वे माल धक्क्यावर प्रत्येक महिन्याला सिमेंट, धान्य युरिया खताचा पुरवठा रेल्वेद्वारे केल्या जातो, हा साठा जिल्हाभर ट्रकद्वारे वितरित करण्यात येतो. मात्र या ठिकाणावरुन वाहतुकीची परवानगी असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहततुक करतांना वाहने सर्रास दिसून येत आहेत. एवढेच काय तर अनेक वाहन धारकांकडे कागदपत्रे सुद्धा नसून अवैध वाहतुक सुरु आहे. तर शहरात जडवाहनांची परवानगी नसतांना दिवसभर अनेक वाहने फिरतांना दिसून येतात. मात्र आरडीओ अधिकाऱ्यांच्या हप्तखोरीमुळे हा प्रकार सर्रास सुरु असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या हप्तखोरीमुळे ओव्हरलोड वाहतुक पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. उपप्रादेशिक वाहतुक कार्यालयाच्या नियमानुसार सहा चाकी वाहनांना 10 टन तर दहा चाकी वाहनांना 16 टन वजनाची वाहतुक करण्याची परवानगी आहे. मात्र अधिक फायद्याच्या हेतुने सध्या सहा चाकी वाहनांमध्ये 18 ते 20 टन तर दहा चाकी वाहनांमधून 28 ते30 टन वाहतुक केली जात आहे. खामगाव शहरात हा प्रकार सर्रास सुरु असून येथील रेल्वे माल धक्क्यावरुन जिल्ह्यासाठी येणारे धान्य युरिया, सिमेंट आदींचा साठा हा ट्रकद्वारे जिल्हाभर पोहचविण्यात येतो. मात्र या ठिकाणावरुन क्षमतेपेक्षा जास्त ट्रकमध्ये भरुन त्याची वाहतुक केली जात आहे. यातील अनेक वाहनधारकांकडे चक्क कोणतीही कागदपत्रे असून अधिकाऱ्यांना हप्ता देवून अवैधरित्या ही वाहने चालविल्या जात आहे. एकीकडे आरडीओ अधिकारी सर्वसामान्यांची वाहने थांबवून त्यांना नाहक त्रास देवून दंडात्मक कारवाई करतात. मात्र माल धक्क्यावर चालत असलेल्या वाहनधारकांकडून कमीशन हप्त्यापोटी असे काळे कारनामे करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर शहरात ओव्हरलोड वाहनांना वाहतुकीस प्रतिबंद असतांनाही अधिकाऱ्यांच्या हप्तखोरीमुळे मोठमोठे ट्रक भरधाव वेगाने खामगाव शहरात वाहतुक करीत असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.
चौकट
अधिकारीच भ्रष्ट असल्यास कायदे कोण पाळणार?
खामगावमध्ये ओव्हरलोड वाहतुकीचा प्रकार सर्रास सुरू असतानाही, संबंधित आरटीओ अधिकारी कारवाई करण्याऐवजी हप्त्यावर ट्रक मोकळे करत असल्याचे चित्र समोर येत आहे. कायद्याचे रक्षण करणारेच जर भ्रष्टाचारात सहभागी असतील तर कायद्याचे पालन कोण करेल? असा संतप्त सवाल आता प्रत्येक सुजाण नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment